Wednesday 28 January 2015

जीवाभावाचे संगीत

' देवाने आपल्याला दिलेली सर्वात अमुल्य भेट कोणती ?' असा प्रश्न जर कोणी मला केला तर माझे उत्तर एकचं असेल " संगीत " ! नाही म्हणजे पाउस, झरे, वारा, नद्या ,द-या, फुलं ह्या सर्व गोष्टीही ' त्याचीच ' कृपा आहे पण ह्या सर्वांमध्ये मला संगीत सर्वात जास्त जवळचं वाटतं …आणि पाहायला गेल तर टिप टिप पडणा-या पावसामध्ये  ,खळ खळ वाहणा-या झ-यांमध्ये ,सुसाट फिरणा-या वा-यामध्ये ही संगीत आहेचं ना ?…लक्ष देऊन ऐकले तर संथ वाहणारी नदी ही एक मंजुळ गाणं गात असल्याचे ऐकू येते …

पक्ष्यांनी आपसात केलेली कुजबूज ,कोकिळेचे मधुर गान ,किर्रर रानामध्ये होणारा रात किड्यांचा आवाज ह्या सर्वांमध्ये ही संगीत लपलेलें आहेचं  . . जिथे ध्वनी आहे तिथे संगीत आलेच ! प्रेमात धुंद असणा-या प्रियकराला त्याच्या प्रेयसी ने केलेली तक्रार ही  एका गाण्यासारखीच वाटत असते , ९ महिने ज्या बाळाला आई तिच्या पोटात सांभाळते , ते बाळ जेव्हा ह्या विश्वामध्ये येते तेव्हा त्या बाळाच्या  रडण्याचा आवाज त्या मातेला कर्कश न वाटता जगातील कोणत्या ही गाण्याहून ,कोणत्याही संगीताहून अधिक प्रिय वाटतो …


माझी ही नाळ मी लहान असतांनाच संगीताशी जोडली गेली … माझ्या वडिलांना जुन्या हिंदी गाण्यांचा  संग्रह करण्याचा खूप मोठा छंद होता … आमच्या घरी वडिल रोज संध्याकाळी कामा वरून आल्यावर ही जुनी हिंदी गाणी ऐकत असत … माझ्यासाठी ही जूनी गाणी जसे रोज घेतले जाणारे Tonic चा डोसच होता .माझ्या आईला ही संगीताची तेवढीच आवड होती .आई रोज सकाळी रेडीओ वर मराठी भक्तीगीते ऐकायची .एकंदरीत घरातील ह्या वातावरणामुळे माझी ही आवड संगीतामध्ये निर्माण होऊ लागली … रफी, लता, किशोर, मुकेश आणि आशा ह्यांची गाणी ऐकत मी मोठा होऊ लग्लो…शंकर-जयकिशन हे वडिलांचे आवडीचे संगीतकार होते पण मला मात्र आर. डी. बर्मनची गाणी आवडायची कारण R . D.च्या गाण्यांमध्ये मला नाविन्य आढळायचे , experimentation जाणवायचे …. आणि पुढे मग १९९२ मध्ये एक चमत्कारच घडला … संगीत सृष्टीत ए. आर . रेहमानचे 'रोजा' नावाच्या चित्रपटाने पदार्पण झाले … मी चौथीत असेन कदाचित तेव्हा .रेहमानचे संगीत फ्रेश होत . ह्या आधी असे संगीत कधीच ऐकण्यात आले नव्हतं … रेहमानच्या संगीताचा ठसा माझ्या जीवनावर कायमचा उमटला .रेहमानची तमिळ गाणी ही मला तोंडपाट येऊ लागली आणि तेव्हा ख-या अर्थाने कळू लागले की " Music Has No Language " … संगीताची ताकत असामान्य आहे . संगीताचे स्थान धर्म आणि जात ह्यांच्या पलिकडे आहे , देश , स्कृती ,सीमारेषा ह्यांच्या  ही पलिकडे आहे … म्हणूनच तर मशहूर Pop गायिका Shakira ने जेव्हा Football World Cup साठी "Waka Waka" हे गाणं गायलं तर  त्या गाण्याच्या तालावर संपूर्ण जग नाचलं होतं कारण कोणालाही भाषेशी लेणंदेणं नव्हतं लोकांचं लेणंदेणं फक्त थिरकणा-या आफ्रिकन संगीताशी होतं.

मला सर्व प्रकाराचे संगीत ऐकण्याची आवड आहे . माझ्या playlist मध्ये एकीकडे हिंदी फिल्म गाणी आहेत तर दुसरीकडे पंडित भिमसेन जोशी आणि पंडित कुमार गंधर्व ह्यांनी गायलेले शास्त्रीय संगीत आणि अभंग ,कुठे  नुसरत फतेह आली खानच्या कव्वाली आहेत तर कुठे Rock Band Nirvana ची गाणी …. जसा मूड तसं संगीत ऐकायची सवई आहे मला ...

संगीत आणि माझी मैत्री पुढे आणखीन घनिष्ट झाली जेव्हा मी गिटार वाजवायला शिकलो … सुदैवाने माझ्या मित्र परिवारामध्ये ब-याच मित्रांना गिटार वाजवायला येत होतं आणि त्यामुळे गिटार शिकणं माझ्यासाठी सोपे झाले . गिटार शिकल्यामुळे मी संगीताला ख-या अर्थाने समजू शकलो व त्याचा आनंद घेऊ लागलो . एखाद्या गाण्यात कोणते स्वर , कोणती पट्टी , कोणते chords वापरलेत ह्याचा अभ्यास करतांना मिळणारा आनंद अभूतपूर्व आहे.

माझ्या ऑफिसचा प्रवास साधारण १.३० तासाचा आहे … ह्या रोजच्या प्रवासामध्ये मी घरून निघतांना संगीताचं इंजेक्शन माझ्या फोनमध्ये गाण्यांच्या रूपाने भरून घेत असतो आणि headphones रूपी सुई मी माझ्या रक्त वाहिन्यांमध्ये टोचून घेत असतो आणि मग माझा संपर्क ह्या काळापुरता बाह्य दुनियेशी  तुटतो आणि थेट संगीताशी आणि हे संगीत आपल्याला प्रदान करणा-या त्या भगवंताशी जुडतो . स्वतःला हे संगीताचे इंजेक्शन रोज देतांना मला जराही दुखत नाही उलट हे इंजेक्शन घेतल्यामुळे तात्काळ माझ्या मनामधील दुखं नाहीसं होतं .कधी ऑफिसला जातांना headphones घरीच विसरलो तर घरी परतीचा प्रवास कधीच संपणार नाही असं वाटत असते …प्रवास रोजचा असो किंवा आपल्या जीवनाचा ,  आपल्याला संगीताची साथ कळत-नकळत लागतच राहते … काही लोकं जीवनामध्ये संगीत शोधत असतात तर काही माझ्यासारखे वेडे संगीतामध्येच जीवन शोधत असतात ...

- हर्ष पवार

1 comments:

  1. हर्षसिंह , खूप सुंदर ... निसर्गाचे संगीत ही माणसाला लाभलेली अमूल्य देणगी आहे , त्या बरोबरीने जीवनात लहान लहान गोष्टींमध्ये
    दडलेले संगीत न्याहाळण्याचा तुमचा भाव एका संगीत प्रेमी हृदयाची साक्ष पटवितो.
    काही लोकं जीवनामध्ये संगीत शोधत असतात तर काही माझ्यासारखे वेडे संगीतामध्येच जीवन शोधत असतात ... हे तुमचे म्हणणे खरोखरीच मनाला स्पर्शून जाते. मन:पूर्वक शुभेच्छा तुमच्या संगीतमय जीवनासाठी !!!

    ReplyDelete