Saturday 4 April 2015

इच्छा , आकांक्षा , इत्यादी ……….

त्या  दिवशी तसा ऑफिसमधून निघायला उशीरच झाला होता..शेवटच्या क्षणापर्यंत काम संपतच नव्हतं... खाली थांबलेल्या कंपनी Cab ड्रायवरचा ही दोन वेळा फोन येऊन गेला होता. त्याला ५ मिनीट आणखी थांब अशी request केली होती.. ड्रायवरचा तिसऱ्यांदा call येत होता.. शेवटी वैतागून PC shut down करून, bag pack करून लिफ्टच्या दिशेने पळालो. खाली आलो आणि धावत जाऊन Cabमध्ये बसलो. ड्रायवरला sorry म्हणालो उशीर झाल्या बद्दल …त्याने "ठीक आहे साहेब " असे म्हणत गाडी स्टार्ट केली .. Cabमध्ये  बसताच सवयीप्रमाणे bagच्या पहिल्या कप्प्यामधून हेडफोन बाहेर काढला. कधी नाही ते हेडफोनच्या वायर्सचा गुंता झाला होता. सुटता सुटत नव्हता.. एका क्षणाला विचार आला गेल्या काही दिवसांपासून आयुष्यात ही असाच प्रश्नांचा गुंता झाला आहे.. प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध घडत आहे. प्रत्येक अंदाज चुकत आहे.. क्षणार्धात भानावर आलो आणि कसाबसा वायर्सचा गुंता सोडवला.. हेडफोनची पिन मोबाइलमधे प्लग केली आणि हेडफोन कानाला लावला .पण त्या दिवशी चित्त ठिकाण्यावर नव्हतं. त्यामुळे कोणतं ही गाणं अगदी 10 सेकंदाहून जास्त लक्ष्य केंद्रित करून घेऊ शकत नव्हतं. मनात असंख्य विचारांचे काहुर माजलेले होते. माझ्या PLAYLISTमधील गाणी मी सतत shuffle करत बसलो होतो.. mood change करण्याचा माझा हा प्रयास असफल ठरत होता . शेवटी 15-20 मिनिटानंतर एका गाण्याचे सुरुवातीचे शब्द मनाला आकर्षित करते झाले :

क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ...
.

'कमीने' चित्रपटातील माझे सर्वात आवडते गीतकार गुलजार ह्यांनी लिहिलेले हे गाणं. ह्या गाण्याच्या ह्या पहिल्या 4 ओळी कानावर पडताच आपली सध स्थिति तशीच असल्याचे पटकन जाणवले आणि मी गाणं शांत चित्ताने ऐकू लागलो , आणि लगेचच ह्या गाण्याच्या पहिल्या अंतराच्या ओळी कानावर पडल्या :

कभी जिंदगी से माँगा पिंजरे में चाँद ला दो
कभी लालटेन देके कहा आसमान पे टाँगो !


बस्स !! हे शब्द म्हणजे माझ्यासाठी एक खुप मोठे रहस्य उलगडणारे ठरले. गेल्या काही दिवसांमध्ये मला पडलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर गुलजार ह्यांनी आपल्या ह्या वरील ओळींमधे दिले होते.

कभी जिंदगी से माँगा पिंजरे में चाँद ला दो
कभी लालटेन देके कहा आसमान पे टाँगो .........


किती खरं आहे हे.. आपण कधी कधी मोहात अडकून, वास्तवाकडे पाठ करून आयुष्याकडून अशाच चुकीच्या अपेक्षा करत असतो.. मी ज्या गोष्टीचा हट्ट करत आहे ती मला खरच हवी आहे का? मी खरच पात्र आहे का ती गोष्ट मिळविण्याकरिता? उद्या ती गोष्ट जर मिळाली तरी मला ती झेपणारी आहे का? ती गोष्ट  मिळवण्यासाठी माझी पूर्व तय्यारी झाली आहे का ? माझ्या अट्टहासामुळे मी माझ्या जवळच्या लोकांची मनं तर नाही दुखावणार ना? हे असे प्रश्न मला पडलेच पाहिजे.. ह्यालाच कदाचित सभान असणे म्हणत असावेत .. पण आम्ही नेमके हाच मूळ प्रश्न स्वतःला विचारायला विसरतो आणि मग आयुष्याकडून " पिंजऱ्यात चंद्र आणून देण्याच्या मागण्या करू लागतो"...  आणि मग माझ्या अपेक्षा भंग पावतात आणि मी आयुष्याला दुषणे देण्यास सुरुवात करतो.. मुळात चूक माझी असते पण मी त्या चुकीकडे दुर्लक्ष करून आयुष्यावर माझ्या पराभूताचे खापर फोडत असतो.
खरतर जेव्हा मी असंख्य अडचणींमधे गुरफटतो, तेव्हा मला माझी गती थोडी हळू करून, शांतपणे ह्या वर उल्लेखलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा... ह्या क्षणाला ही पोस्ट वाचत असणाऱ्या तुम्हा सर्वांना काही न काही तरी आयुष्याकडून हवच आहे, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतीलच तर तुम्ही देखील थोडा वेळ काढून हा अभ्यास केला तर तुम्हाला ही तो नक्की फायदेशीर ठरेल ह्याची खात्री बाळगा ..

आयुष्य एवढं वाईट नसतं जेवढं आपण त्याचा कस लावत असतो.. आयुष्यावर प्रेम करता आले पाहिजे आणि गुलजार ह्यांच्याच खालील गाण्यानुसार आयुष्याला एक प्रेमळ विनवणी करता आली पाहिजे :

ए जिंदगी गले लगा ले,
ए जिंदगी गले लगा ले, 
हम ने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है, है ना.. ?
ए जिंदगी गले लगा ले ...........

हर्ष पवार 

1 comments:

  1. हर्ष , दैनंदिन जीवनात आशा , आकांक्षा, इच्छा ह्यांच्या जाळ्यात आपण गुरफटत जातो आणि नेमके मला नक्की काय हवे ह्याचे भानच रहात नाही, ह्या बद्दल खूप सोप्या आणि सहज रीत्या अगदी मनाला पटेल आणि वास्तवतेचे भान राखायला आपोआप सहजगत्या शिकवेल असे सुंदर लिखाण !!

    ReplyDelete