आज ही ती मला 'बाळ' म्हणूनच हाक मारते ..ते म्हणतात ना मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती तिची बाळचं असतात , तसाच हा तिचा अनुक्रम ..शाळेपासून ते आता ऑफिस पर्यंत ती मला जेवणाचा डब्बा बनवून देते ..तिला कितीही सांगितलं की कॅन्टीनमध्ये मिळतं गं चांगलं जेवण तरी ती ऐकत नाही , " काय रे ते सोडा टाकलेलं जेवण आवडतं तूला ? " अशी रागावते ..मग मला कधी पहाटे लवकर जायचे असेल कामावर तर माझ्या सोबतच उठते खास डब्बा बनवण्यासाठी ..ह्या तिच्या अश्या लाडामुळे साहजिकच माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी तिला " तू फक्त त्याचीच आई आहेस " अशी तक्रार करतात ..तिच्याकडे असा दुजाभाव नाही आहे .. आईसाठी तिची सर्व लेकरे सारखीच असतात ..पण हे जरी असे असले तरी मी तिचा सर्वात लाडका होतो आणि अजून ही आहे हे मात्र तेवढेच खरे ...
घरात सर्वात लहान असल्यामुळे माझे सर्वात जास्त लाड झालेत ..सर्व साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाल्यामुळे मी ही कधी फार मोठ मोठे हट्ट नाही केलेत तिच्याकडे ..पण आठवतं शाळेत प्रथम क्रमांक आल्यावर ती मला नेहमी एखादा Game घेवून द्यायची आणि एकदा scholarship मिळाल्यावर मी तिला video game घेवून देण्यासाठी केलेला हट्ट जो तिने त्या काळात सर्वात महागडा video game विकत घेऊन देऊन पूर्ण केला होता ..लहान असतानाचा एक वाढदिवस आठवतो , पूर्ण दिवसभर हिरमुसलेलो होतो मी काही कारणामुळे .. मग अचानक संध्याकाळी आइने नवीन टी-शर्ट आणला माझ्यासाठी ..कसला खुश झालो होतो ... मी शाळेत असताना माझा वाढदिवस ही ती खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करायची ... मला मंदिरात घेऊन जायची आणि मग मंदिरा बाहेर बसणाऱ्या गरीबांना भाजी-पोळी , बटाटा वडा , लाडू इत्यादि असे खाण्याचे पदार्थ माझ्या हातून द्यायची ...
७वीत असताना मित्रांसोबत एरियामध्ये ३१ डिसेंबरची पार्टी आठवते .. १०० ₹ कॉन्ट्रिब्यूशन होतं ... बहिणींचा सरळ सरळ विरोध होता " कसल्या पार्ट्या करतोय, कुठे ही पाठवू नकोस आई ह्याला " ..आई ही त्यांच्याशी सहमत वाटली , मग मला नाराज झलेले पाहुन तिने मला किचनमधुन साखरेच्या बरणीमधून थोड़ी साखर आणून दे असे सांगितले , बरणी उघडून पाहिले तर आतमध्ये एक कोरी करकारीत १०० ची नोट माझी वाट पाहत होती ...आईने दुरुनचं मला शांत राहण्याची खूण केली ..आज हज़ारो रुपय खर्च करून ही त्या दिवशी केलेल्या पार्टीतली धमाल पुन्हा अनुभवायला नाही मिळाली .. शाळेतील सहल म्हटलं की आईकडूनच परवानगी आणि सहलीची फीस मिळवायची ..
जस जसा मोठा होत गेलो तस तसा तिच्या मनाच्या मोठेपणाचा अंदाजा येऊ लागला ... फक्त अंदाजा , कारण त्याचा पूर्ण ठाव कोणालाच घेता नाही येणार ..स्वतः देवाला ही नाही...ह्या जगाच्या पाठीवर तुमची आईच एक अशी व्यक्ति असते जी तुमच्यावर लाभेवीण प्रीति करत असते , तिच्या प्रेमाची पुसटशी तुलना ही कोणा सोबत होऊ शकत नाही ... आणि तिने केलेल्या तुमच्यावर प्रेमाची भरपाई वगैरे लांबच राहू द्या तुम्ही केलेली नुसती तिच्या प्रेमाची जाणीव देखील तिला सुखावून जाते .. मूर्तिमंत त्याग म्हणजे आई ..
आज Mother's Day च्या निमित्ताने ह्या सर्व लहान-सहान आठवणींची उजाळणी करण्याचे ठरवले ...
माउली तुला कोटी कोटी प्रणाम ....
- हर्ष पवार